आज दीपावलीचा पहिला दिवस 'धनत्रयोदशी'. ब्रह्म मुहूर्तावर उठून कोमट पाण्यात धने घालून आंघोळ करण्याची परंपरा. इतक्या वर्षात आज ती परंपरा मी अनुभवली. विचार आला, नेहमी हाच रूटीन फॉलो केला तर आपल्या आयुष्यातील ग्रहमान सकारात्मकतेने बदलून जायचे हो! असो..
आजच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिपती. देव-असूर संग्राम सुरू असताना समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन येणारे भगवान श्री विष्णू यांचा 'देवतांचे चिकित्सक' म्हणून अवतार असलेले असे हे भगवान धन्वंतरी. आज दीपावली म्हंटल की मार्केट मध्ये झगमगाट आणि रोशनाई असते. ग्राहक आकर्षणाकरिता दुकानांपुढे वेगवेगळे देखावे लावण्यात येतात. एकंदरीत माहौल असतो.
पण धनत्रयोदशीचं हेच महत्व आहे का?
सकाळी कीर्तन ऐकत होतो. त्यात ते महाराज आजच्या दिवसाचं महत्व सांगताना म्हणाले की आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आपली विकृत मानसिकता धनत्रयोदशीला पैश्यांची उधळण करून दिवस साजरा करणारी आहे. महागड्या वस्तू विकत घेऊन आपण मिरवतो. हे कुठेतरी बंद व्हायला हवं.
'हेल्थ इज वेल्थ' हे ब्रीद वाक्य प्रत्येकाने आपल्या बुद्धीच्या पाटीवर कोरून ठेवायला हवे. आजच्या प्रदूषणाने ग्रासलेल्या जगात ज्याची हेल्थ चांगली आहे, जो अगदी फिट अँड फाइन आहे, अश्या व्यक्तीला खर्या अर्थाने श्रीमंत म्हंटले पाहिजे.
बाकी, हाऊज् युअर दीपावली गोईंग?