गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात भाषेवरून काय तो गदारोळ सुरूय? लोकं एकमेकांना शिव्या काय देतातय, हाणामारी काय करतातय! माय गॉड!
असल्या बिनकामाच्या रिकाम्या समाजकंटकांनी ह्या विषयातून शेवटी काय निष्पन्न होईल किमान त्याचा तरी अभ्यास करावा म्हणजे आम्हालाही कळेल आम्ही 'कॉमन मॅन' आजवर कुठे चुकलोय ते.
जाति द्वेष, वर्ण द्वेष, इ. गोष्टी राजकारणी लोकांना कमी पडल्यात का, की आता भाषेवरून राजकारण सुरू झालंय. फॉर यूअर काईंड इन्फॉर्मेशन गाईज, आपला देश प्रगतीशील आहे, प्रगत नाही. म्हणजेच काय तर आपला भारत देश डेव्हलपींग देश आहे, डेव्हलपड् नव्हे. आपल्याला बर्याच गोष्टींना सामोरे जायचंय, बर्याच संकटांना तोंड द्यायचंय.
अमेरिकेने भारतावर टॅक्स चा भरमार केलाय, आपण आर्थिक संकटात आज नसलो तरी भविष्यात कधीही आर्थिक संकट येऊन ठेपू शकतं. मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर' मूळे पाकिस्तान घायाळ झालाय आणि चीन त्याला रसद पुरवतोय. तुर्की ने तर पाकिस्तान ला जाहिर पाठींबा दिला होता.
सद्यस्थितीत जिओ-पॉलिटिक्स इतकी संवेदनशील असताना भारताचा कणा असलेल्या महाराष्ट्रात भाषेवरून वाद सुरूय? सिरियसली?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, ही बाब कोट्यावधी मराठी बोली असणार्या लोकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आपल्या मातृ भाषेचा अभिमान हा असायलाच हवा. पण माज? माज गरजेचा आहे का हो? आजच्या तारखेला मराठी भाषेसाठी भांडणार्यांपैकी कित्येक लोकांना 'महाराष्ट्र दिन' कधी असतो, महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री कोण?, राज्य पक्षी कोणता, इत्यादींसारख्या अनेक बेसिक प्रश्नांची उत्तरे माहिती नसतील.
आपल्या भाषेला समृद्ध करणारे कलाकार, लेखक, कवी, नाटककार आपल्याला खूप लाभले. पु. ल. देशपांडे यांची हास्यरसात भरलेली लेखनशैली असो, किंवा ग. दि. माडगूळकर यांचं गाण्यांमधून बोलणारं काव्य असो – या सगळ्यांनी आपली भाषा आपल्याला नव्याने समजावली.
मुलांनी इंग्रजी शिकावं, जगाच्या गतीशी चालावं यात दुमत नाही, पण मराठी विसरू नये. आपली भाषा हे आपल्या मुळांचं प्रतीक आहे. झाड कितीही मोठं झालं तरी मुळे जमिनीशी जोडलेली असतात. तसेच, आपण कितीही शिकून मोठे झालो तरी, आपल्या मातृभाषेशी आपलं नातं तुटता कामा नये.
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥
ज्ञानोबांनी वरील ओळींमध्ये मराठीचे किती सुंदर वर्णन केलंय बघा.
तीच वेली पुढे नेत कविवर्य सुरेश भटांनी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' सारखी सुरेख कविता आपल्याला दिली.
ह्या थोर महापुरुषांनी मराठी भाषेचं कौतुक करताना इतर भाषांचं द्वेष केलंय का? तर नाही.
भाषेच्या मुद्द्यावरून आपापसात भांडत बसण्यापेक्षा ह्या विषयावर कायमस्वरूपी एक तोडगा काढून राज्य आणि देश पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.
शेवटी काय? देशहिताला प्राधान्य देण्याची सद्यस्थितीला जास्त गरज आहे. चार वेगवेगळ्या दिशेची लोकं एकत्र आली की तू-तू, मैं-मैं आणि मतभेद होणारच, आपल्या हिताचं कायंय हे आपणच ठरवलं पाहिजे.
बाकी,
जय महाराष्ट्र!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा