माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्दांचा अर्थ माहिती असेलच असं गृहीत धरून आजच्या विषयास हात लावतो.
बरं, ह्या दोन शब्दांतील अंतर माहिती नसेल तर तेही सांगतो. 'स्वातंत्र्य' म्हणजे जिथे परावलंबित्व नाहीसं होतं, तुम्ही वैचारिक, आर्थिक, शारीरिक आणि मानसिकपणे निर्णय घेण्यास कोणावरही अवलंबून नसता. पण, एक्सक्युज मी डिअर फ्रेंड्स, थांबा, स्वातंत्र्य म्हणजे तितकंच नव्हे, स्वातंत्र्य स्वतः सोबत घेऊन येतो ती जबाबदारी. स्वातंत्र्य कधीही सांस्कृतिक आणि पौराणिक विचारांशी तडजोड करीत नाही. स्वातंत्र्य हे नेहमी माणसाला ग्राउंड टु अर्थ ठेवतो. 
आता येवूया 'स्वैराचार' ह्या शब्दावर. जेव्हा आपल्याला मनमोकळेपणाने आणि विना कोणाची परवाह करताना वावरता येतं त्याला स्वैराचार म्हणता येईल. पण, स्वैराचार ह्या शब्दाचा अर्थ एवढाच होतो का? तर नाही. स्वैराचार स्वतः सोबत आणतं ते मुजोरी, उद्धटपणा आणि बेलगाम-बेछूट वागणूक.
ह्या दोन्ही शब्दांतील फरक खूप ठळक असूनही काही जण स्वैराचार हेच स्वातंत्र्य समजून मूर्खपणाने वागतात. असो. 
आता येऊया आजच्या मुद्द्यावर, 'स्वच्छंद'.. 
स्वच्छंद ह्या शब्दाला नीट समजून घ्यायचं असेल तर एखाद्या लहानग्या मुलाला किंवा बाळाला बघा. ते अजाण अन् अबोध बालक, त्याची वागणूक निरखून बघितली की आपल्याला अगदी सहजच कळेल स्वच्छंद असणे म्हणजे काय ते. 
आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या प्रेयसीला बघा जी आपल्या प्रियकराच्या प्रेमात आकांत बुडालेली असेल. 'मी मज हरपून बसले गं' पासून 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' पर्यंतचा तिचा प्रवास बघा, तिचं तिच्या प्रियकरावर जीव ओवाळणं बघा. त्यातही तुम्हाला स्वच्छंदपणाचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. 
बागेत गेल्यावर किंवा इतरत्र कुठेही सूर्यफूलावरती भिरभिरणारी मधमाशी बघा. मधमाशीचा गुण हा स्वच्छंदच! 
अगदी निर्भीड आणि बिनधास्तपणे जगता यावं तेही स्वच्छंद मराठी कवितेसारखं, यालाच तर स्वच्छंदपणा म्हणतात.. 
काय मग डिअर, आहेस ना तू 'स्वच्छंदी'?

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

मृत्युपत्र..

शीर्षक वाचून कळलंच असेल विषय किती गंभीर असेल ते. आमच्या वकिलीच्या भाषेत 'मृत्युपत्र' म्हंटलं की डोळ्यापुढे येतं ते स्थावर मालमत्ता, दाग-दागिने, पैसे, बँकेची एफ.डी., इ. आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रॉपर्टीची वहिवाट कशी आणि कोण करेल त्यासाठी म्हणून हयातीत लिहिला जाणारा दस्त म्हणजे आम भाषेत मृत्युपत्र. पण, जे मला सांगायचंय, तो 'मृत्युपत्र' वेगळाय.

आपलं जीवन आपण कसं जगायचं हे जरी आपल्या हाती असलं तरी, आपला मृत्यू आपल्या हातात अजिबातच नाहीये. आज हसत खेळत जगणारी व्यक्ती उद्या काळाच्या विळख्यात सापडते आणि आपल्या नजरेच्या लांब निघून जाते आणि हा प्रसंग प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभवलाच असेल. मी पण अनुभवलंय हे. माझी आज्जी संध्याकाळ पर्यंत हसरी बोलकी होती आणि एकाएकी तिला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि क्षणार्धात ती होत्याची नव्हती झाली. देवाने तीचं एवढंच आयुष्य लिहिलं असावं आणि आम्ही ते मान्य देखील केलं.

असो. 

हे मृत्युपत्र मला लिहायचंय ते थेट परमेश्वराला उद्देशून!

ज माझ्या आयुष्याची ढकलगाडी ही विशीतील मध्यान्यात येऊन पोहोचलीय. माझ्याकडे स्वतःची किंवा स्वार्जित अशी खूप धन-दौलत काहीच नाहीये. मृत्यू कधीही माझ्या दाराशी येऊन दार ठोठावू शकतो. आज किंवा उद्याही!

मग सरतेशेवटी मी माझ्या आत्मीयांसाठी काय केलंय, इष्ट मित्रांसाठी काय केलंय, ह्या समाजासाठी, देशासाठी काय केलंय हेच महत्त्वाचं ठरेल. मी माझ्या अल्प प्रयत्नाने, बुद्धी कौशल्याने आणि जमेल तितक्या तितिक्षेने मला माझ्या घरच्यांसाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी जे-जे काही करता येईल तेवढं मी करेल.

देवा परमेश्वरा, मी ह्या इहलोकातून सांगता घेतल्यानंतर तुझ्यावरच एक जबाबदारी सोडून जाईल, ती म्हणजे, मी इथून गेल्यावर माझ्या मागे जेव्हा-केव्हा लोकं माझी आठवण काढतील तेव्हा टचकन त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला हवं. माझ्याबद्दल ऐकताना माझ्या घरच्यांना गौरवान्वित आणि समाधानी वाटू दे, ना की तिरस्कार.

देवा, तुझ्याकडून मला ऐशो आराम वैगेरे असली महागडी मागणी काहीच नाहीये, खूप स्वस्त आणि तुला परवडणारी हीच एक मागणी आहे की, माझ्या मरणोपरांत माझं नाव आणि चारित्र्य हे निष्कलंक ठेव आणि सगळ्यांना सुखी व समाधानी ठेव.

तुझा विश्वासू, 

... 

रविवार, २० जुलै, २०२५

नो डाऊट, मराठी इज अवर प्राइड!

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात भाषेवरून काय तो गदारोळ सुरूय? लोकं एकमेकांना शिव्या काय देतातय, हाणामारी काय करतातय! माय गॉड! 

असल्या बिनकामाच्या रिकाम्या समाजकंटकांनी ह्या विषयातून शेवटी काय निष्पन्न होईल किमान त्याचा तरी अभ्यास करावा म्हणजे आम्हालाही कळेल आम्ही 'कॉमन मॅन' आजवर कुठे चुकलोय ते. 

जाति द्वेष, वर्ण द्वेष, इ. गोष्टी राजकारणी लोकांना कमी पडल्यात का, की आता भाषेवरून राजकारण सुरू झालंय. फॉर यूअर काईंड इन्फॉर्मेशन गाईज, आपला देश प्रगतीशील आहे, प्रगत नाही. म्हणजेच काय तर आपला भारत देश डेव्हलपींग देश आहे, डेव्हलपड् नव्हे. आपल्याला बर्‍याच गोष्टींना सामोरे जायचंय, बर्‍याच संकटांना तोंड द्यायचंय. 

अमेरिकेने भारतावर टॅक्स चा भरमार केलाय, आपण आर्थिक संकटात आज नसलो तरी भविष्यात कधीही आर्थिक संकट येऊन ठेपू शकतं. मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर' मूळे पाकिस्तान घायाळ झालाय आणि चीन त्याला रसद पुरवतोय. तुर्की ने तर पाकिस्तान ला जाहिर पाठींबा दिला होता. 

सद्यस्थितीत जिओ-पॉलिटिक्स इतकी संवेदनशील असताना भारताचा कणा असलेल्या महाराष्ट्रात भाषेवरून वाद सुरूय? सिरियसली?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, ही बाब कोट्यावधी मराठी बोली असणार्‍या लोकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आपल्या मातृ भाषेचा अभिमान हा असायलाच हवा. पण माज? माज गरजेचा आहे का हो? आजच्या तारखेला मराठी भाषेसाठी भांडणार्‍यांपैकी कित्येक लोकांना 'महाराष्ट्र दिन' कधी असतो, महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री कोण?, राज्य पक्षी कोणता, इत्यादींसारख्या अनेक बेसिक प्रश्नांची उत्तरे माहिती नसतील. 

आपल्या भाषेला समृद्ध करणारे कलाकार, लेखक, कवी, नाटककार आपल्याला खूप लाभले. पु. ल. देशपांडे यांची हास्यरसात भरलेली लेखनशैली असो, किंवा ग. दि. माडगूळकर यांचं गाण्यांमधून बोलणारं काव्य असो – या सगळ्यांनी आपली भाषा आपल्याला नव्याने समजावली. 

मुलांनी इंग्रजी शिकावं, जगाच्या गतीशी चालावं यात दुमत नाही, पण मराठी विसरू नये. आपली भाषा हे आपल्या मुळांचं प्रतीक आहे. झाड कितीही मोठं झालं तरी मुळे जमिनीशी जोडलेली असतात. तसेच, आपण कितीही शिकून मोठे झालो तरी, आपल्या मातृभाषेशी आपलं नातं तुटता कामा नये.


माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥


ज्ञानोबांनी वरील ओळींमध्ये मराठीचे किती सुंदर वर्णन केलंय बघा. 

तीच वेली पुढे नेत कविवर्य सुरेश भटांनी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' सारखी सुरेख कविता आपल्याला दिली. 

ह्या थोर महापुरुषांनी मराठी भाषेचं कौतुक करताना इतर भाषांचं द्वेष केलंय का? तर नाही. 

भाषेच्या मुद्द्यावरून आपापसात भांडत बसण्यापेक्षा ह्या विषयावर कायमस्वरूपी एक तोडगा काढून राज्य आणि देश पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. 

शेवटी काय? देशहिताला प्राधान्य देण्याची सद्यस्थितीला जास्त गरज आहे. चार वेगवेगळ्या दिशेची लोकं एकत्र आली की तू-तू, मैं-मैं आणि मतभेद होणारच, आपल्या हिताचं कायंय हे आपणच ठरवलं पाहिजे. 


बाकी, 

जय महाराष्ट्र!

गुरुवार, २६ जून, २०२५

माल्यार्पण इज नॉट अ शो!

नुकतेच परम पूजनीय श्री गोळवलकर गुरूजी यांची पुण्यतिथी होती आणि त्या निमित्ताने नागपुरातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने गुरुजींना मानवंदना देण्याकरिता माल्यार्पण कार्यक्रम आयोजिला होता. अर्थात मी तेथे गेलो म्हणूनच हा ब्लॉग मला लिहावासा वाटला.

मनी ना ध्यानी, मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आताच्या काळातील नियमित घडणार्‍या घटनेला साक्षी झालो. ती घटना म्हणजे 'फोटोग्राफी'. बार रूम तुडुंब भरून गेली होती, गर्दी इतकी की काही सुचेना. अश्यात आगमन झाले ते प्रमुख पाहुण्यांचे. ते आले, मानवंदना दिली, माल्यार्पण केलं आणि.. आणि अखेर सुरू झाला 'फोटो सेशन!' कधी एकट्याचा तर कधी ग्रुपने. पण एक मिनिटं, गोळवलकर गुरुजींच्या विचारांचं काय? त्यांनी केलेल्या कार्याचं काय? सपशेल विसर? 

रा. स्व. संघाचं डॉक्टर हेडगेवारांकडून ज्यावेळी बीज रोवलं गेलं तेव्हा गोळवलकर गुरूजींचा आद्य सरसंघचालकांशी संपर्क झाला नव्हता. गुरुजींचा हेडगेवारांशी कसा संपर्क आला ते आपण नंतर जाणून घेऊया, पण जेव्हा हेडगेवार हे आपल्या शेवटच्या दिवसांत होते तेव्हा आपले संघ कार्य कोण पुढे नेणार? असा प्रश्न त्यांना पडला आणि उत्तर होतं 'माधव सदाशिव गोळवलकर' उपाख्य 'गुरूजी'. काय महती असेल त्यांची की त्यांच्या कार्याला ओळखून डॉक्टरांनी गुरुजींना सरसंघचालक बनवले. 

गुरूजींनी पूर्ण देशभर संघ कार्याचा प्रचार केला, अख्खं भारत पिंजून काढलं, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न केला आणि संघ अजरामर ठेवण्याकरिता सतत कार्य करीत राहीले. 

संघ गीत मालेतील 'चाहिए आशिष माधव नम्र गुरूवर प्रार्थना।' हे गीत माझं वन ऑफ़ दी फेव्हरेट आहे. हे गीत ऐकुन डोळे अक्षरशः पाणावतात आणि तना-मनात ऊर्जेचा संचार होतो ते औरच! 

त्या दिवशी फोटोसेशन करणार्‍यांनी माल्यार्पण होताच गुरूजींच्या विचारांना विसंगत असे काहीसे कृत्य केलच असतील. अॅटलिस्ट आपण ज्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत त्यांच्या विषयी, त्यांच्या कार्या विषयी जरा का होईना माहिती करून ठेवावी, म्हणजे काय ना, नसता तो शो-ऑफ होणार नाही आणि समाजाच्या हिताचं काम आपण करू शकू..


मंगळवार, ३ जून, २०२५

पुण्याची गणना कोण करी?

ह्या ब्लॉगच्या टाइटलवरून तुम्हाला हे क्लीअर झालंच असेल मला काय लिहायचंय ते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी हरिपाठ लिहिला आणि आजच्या आधुनिक युगात सुद्धा त्याची महती आहे आणि अर्थात ती द्विगुणितच होतीय.

श्रीमद्भागवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनास अध्याय दुसरे श्लोक ४७ मध्ये सांगतात 'तुमचा केवळ कर्मावर अधिकार असतो, कर्मफळावर नाही'.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

समर्थ रामदास स्वामी महाराज रचित मनाचे श्लोक मधील उपरोक्त ओळी आहेत. आपल्या बालपणात किंवा आजतागायत हे श्लोक तुमच्या कानी निश्चितच आलं असेल. असो.. 

श्रीमद्भागवत गीता, मनाचे श्लोक आणि हरिपाठ ह्यातील साम्य बघितल्या गेल्यास हे तिन्ही मानवी जिवाला जगण्याची प्रेरणा देणारे उद्गार करतात.

कर्म कसलंही असो, चांगलं वा वाईट, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार, हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही.

यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही सोशल साइट्सवर सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट स्वतःला दानवीर सिद्ध करण्यासाठी ते करीत असलेल्या कामाचा विडिओ बनवून त्यावर इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक लावून अपलोड करतात. बर्‍याचदा हीच सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट मंडळी मानवतेच्या मर्यादा ओलांडताना सुद्धा दिसते. दान करण्याचं काम असं असावं की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये.

आजच्या आधुनिक युगात आपण इतके वाहवत चाललो आहोत की पौराणिक ग्रंथांचा आणि विचारांचा आपल्याला सपशेल विसर पडलेला आहे. कन्टेंट क्रिएशन चा नाद करता-करता लाइक-कमेन्ट-सबस्क्राईप करणारी जनता हीच आपण केलेल्या कामाची गणना करणारी 'इष्ट देव' असं आपण ठरवून बसलो आहोत. 

माय फेलो मनुष्य मित्रहों! पुण्याची गणना करण्याचा सर्वस्वी अधिकार हा केवळ त्या ब्रह्म देवाचाच आहे. 

म्हणून, 

सगुण निर्गुण गुणाचें अगुण।

हरिवीण मन व्यर्थ जाय॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।

पुण्याची गणना कोण करी॥


शुक्रवार, ९ मे, २०२५

सुखी एकांत..

आज बर्‍याच दिवसांनी ब्लॉग लिहायला घेतलाय आणि ब्लॉगची ही साईट हंड्रेड अँड वन पर्सेंट मला हेच म्हणत असेल की, 'नाईस टू सी यू अगेन, मि. अक्षय. व्हेअर हैव यू बीन सीन्स सो मेनी मंथस्?' 

हेच एखाद्या सुंदर मुलीने मला विचारलं असतं तर कदाचित 'एवढ्या महिन्यांपासून तुझ्या विचारात हरवलो होतो' असं काहीसं उत्तर मी दिलं असतं. पण तूर्तास, 'शेड्यूल खूप पॅक होतं, त्यामुळे लिहायला फारसा वेळ देऊ शकलो नाही' हेच म्हणेल. असो. 

दोन शब्दांचा टाइटल वाचून मला ह्या ब्लॉग मध्ये नेमकं काय म्हणायचंय ह्याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आली असेलच आणि मला हेच अपेक्षीत आहे. 

आता वरील उल्लेखीत ओळींमध्ये सर्रासपणे मी कोणत्यातरी एका 'सुंदर' मुलीला फ्लर्ट केलं जे की 'सुखी एकांत' ह्या टाइटल ला अनुसरून तर नक्कीच नाहिये. पण, एकांतात माणूस फ्लर्ट करू शकत नाही असं तरी कुठे लिहिलंय ना?

मुद्द्यावर येऊया.. चला तर, 'सुखी एकांत' ह्या दोन शब्दांचा अर्थ मला काय कळलाय तो जाणून घेऊया.. 

बरं, तुम्हाला कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ओळी आठवतात का? 

एक बाकी एकाकी,

एक अंत एकांत.. 

एक अडके एकात,

एक एकटया जगात..

एक खिडकी एक वारा,

एक चंद्र एक तारा..

एक नजर एक वाट,

एक एकटा.. एकटाच..

बस्sssss!! किती सोपंय हे! ह्या ओळी ज्याला कळल्या, त्याला हे जग अगदी रिलैक्सपणे जगता येईल.  

काही आठवड्यांपूर्वी सन १९६५ रोजी प्रदर्शित झालेला देवानंद यांचा 'गाईड' मूव्ही बघितला. त्या मूव्हीच्या उत्तरार्धातून प्रेरित माझं हे ब्लॉग. देवानंदच्या अभिनयाचे क्या कहने, खूपच भारी. पण, मनाला हेलकावा देणारी त्या मूव्हीची कथा सुद्धा तितकीच सुंदर आणि मार्मिक मला वाटली. मनात हळुवार स्पर्श करून गेलेला विचार असा आला की माणसाने काही काळ का होईना, पण एकटं जगून बघावं, मनातल्या किंवा मेंदूतील विचारांनी आपल्यावर ताबा घेण्याआधी, आपण त्या विचारांना आटोक्यात घेणं अती जरूरीचं आहे. 

बाकी, मी माझ्या एकांतात सुखी आहे, तुझं काय स्टेटस आहे, माय डिअर फ्रेंड? 


दि. ०९.०५.२०२५

नागपूर 


मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

इंडियन इंग्रज, सुशिक्षित महामूर्ख..

वर्ष २०२४ पूर्णत्वाला आलाय आणि सोशल मीडियावर हॅप्पी न्यू ईयरचे वारे वाहत आहेत. कुठे थर्टी फर्स्ट चा प्लॅन बनतोय तर कुठे नवीन वर्षाचे नवीन रिसॉल्यूशन्स बनताहेत. एकंदरीत सगळीकडे उत्साह जोमात आहे. मॉलस्मध्ये इतके सुरेख देखावे उभारण्यात आलेत की काय सांगू.. 

बरं, तुम्हाला आठवताय का, गुढीपाडवा असेल आणि तेव्हा ह्याच मॉलस्मध्ये मोsssठीsss गुढी उभारली असावी? नाही ना? तीच तर गम्मत आहे लोकं हो!
वेस्टर्न कल्चर फॉलो करताना मूळ भारतीय संस्कृतीचा आपल्याच मार्फत ह्रास होतोय. घराबाहेर कितीही संघटना जागृतीकरण करीत असल्या तरी घरातील चार भिंतींच्या आतले विचार मॅटर करतात. नव्हे, आपण कुठे भरकटत चाललोय याचं एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 
काय महत्व इंग्रजी नवीन वर्षाचं? काही वैशिष्ट्ये असतील तर नक्कीच सांगा मला. फक्त कॅलेंडर बदलतो हेच एक ठाऊक आहे. वातावरणात, हवा-पाण्यात, नैसर्गिक इ.इ. काहीच बदल नाही. हिवाळ्यात दुपारी कडक ऊन, संध्याकाळी पाऊस आणि रात्री गारठा, हेच का तुमचं थर्टी फर्स्ट?

सकारात्मकता कुठेय?

तेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला बघा, वातावरण कसं खुशनुमा होतं ते. चहूकडे प्रसन्न वातारण असतं, नैसर्गिक बदल होतो. त्या दिवसाला विशेष महत्व आहे. तोच आपला न्यू ईयर आहे पोरं हो! आपलं कल्चर, आपलं ट्रेडेशन आपल्यालाच जपायचंय. डिजे च्या तालावर धांगडधिंगा करण्यापेक्षा पाडवा पहाट अनुभव करून बघा. तुम्हाला सौ टक्का कळेल गुढीपाडव्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट!

आता तरी जागा आणि गुढीपाडवा हाच आपला न्यू ईयर म्हणून सेलीब्रेट करा.

'इंग्रजी' नवीन वर्षाच्या 'इंडियन' इंग्रजांना खूप शुभेच्छा! 

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...